DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चिन्ह दिसू लागली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेल्या रस्ता रुंदीकरणामुळे उद्यानाची सुमारे २७ गुंठे जागा कमी झाली होती. त्यामुळे उद्यानाच्या विकासासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून करण्यात आली होती.
यासंदर्भात विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उद्यानालगतची सुमारे दोन एकर जमीन उद्यानासाठी उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
यासाठी संबंधित जागेचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासासाठी मोठी अतिरिक्त जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पातील रस्ता रुंदीकरणामुळे उद्यानाची जागा कमी झाल्याने उद्यानाच्या प्रस्तावित विकासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने उद्यानाच्या सुशोभीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बैठकीस नगरविकास विभागाचे अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, नगररचना अधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आता महापालिका प्रशासनाकडून आरक्षण बदलाचा प्रस्ताव कधी तयार करून शासनाकडे पाठविला जातो आणि त्यावर शासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.



