DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील चार सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पात १८४ रहिवाशांची १७६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी टायकून समूहाचे बिल्डर श्रीकांत शितोळे यांच्यासह चेतन सराफ, महेश गोसावी आणि अन्य संबंधितांविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, चिकणघर परिसरातील चार सोसायट्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी टायकून बिल्डरकडे देण्यात आली होती. मात्र, ठरलेल्या मुदतीत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मूळ रहिवाशांसह नव्या सदनिका खरेदीदारांनाही घराचा ताबा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार नंदा म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकल्पातील ‘ए’ विंगमधील ११ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०१ साठी ३९ लाख ३६ हजार ६९ रुपये भरले होते. जुलै २०२५ पर्यंत सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदत उलटूनही सदनिकेचा ताबा मिळालेला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सध्या प्रकल्पाचे बांधकाम दहाव्या मजल्यापर्यंत झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यापुढील काम अर्धवट आहे. पुनर्विकास, सदनिकांचा ताबा आणि आर्थिक व्यवहाराबाबत दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल १८४ जणांची १७६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, टायकून समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारदार महिलेचा सदनिका खरेदीचा व्यवहार सुमारे ४० लाख रुपयांचा असताना १७६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दावा करणे चुकीचे असल्याचे समूहाने म्हटले आहे. विविध प्रकल्पांना धोरणात्मक त्रुटींमुळे विलंब झाला असून संबंधित प्रकल्प रेरा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असल्याने ग्राहकांनी रेरा प्राधिकरणाकडे दाद मागावी, असेही समूहाने स्पष्ट केले आहे.
काही स्थानिक विरोधक आणि नेत्यांकडून प्रकल्पातील अडचणींचा गैरफायदा घेत बिल्डरवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही टायकून समूहाने केला आहे. केंद्र सरकारकडून प्रकल्पासाठी निधीच्या वित्तपुरवठ्याला अंतिम मंजुरी मिळाल्याचा दावा समूहाने केला असून, काही ग्राहकांना हाताशी धरून प्रकल्प बळकावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचेही समूहाने म्हटले आहे.p या संदर्भातील पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा टायकून समूहाने केला आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासात आरोपांमागील आर्थिक व्यवहार, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि संबंधित पक्षांची भूमिका याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
- September 30, 2026
कल्याणच्या बड्या बिल्डरविरोधात १७६ कोटींच्या फसवणुकीचा आरोप; खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



