DESK MARATHI NEWS NETWORK
कल्याण/प्रतिनिधी – गरजू नागरिकांना घराचे स्वप्न दाखवून त्यांच्या कष्टाचे लाखो रुपये हडप करणाऱ्या टायकून्स अवंती ग्रुप विरोधात MPID Act अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केली आहे.
या प्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात टायकून्स अवंती ग्रुप विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी बीएनएस कलम 3(5), 316(2), 318(4) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
72 जणांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी 72 पीडित नागरिकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेकडो नागरिकांनी घर बुक करण्यासाठी लाखो रुपये भरले होते, मात्र वर्षे उलटूनही ना घर मिळाले ना पैसे परत मिळाले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. गटनेत्या कांचन कुलकर्णी म्हणाल्या, “टायकून्स अवंती ग्रुपचे श्रीकांत शितोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारला आहे. हे सामान्य गुन्हे नाहीत, तर ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या MPID कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेणेकरून त्यांच्या मालमत्ता जप्त करून पीडितांना न्याय मिळेल.”
निष्पक्ष चौकशीची मागणी
या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, सत्य परिस्थिती समोर यावी आणि पीडित नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे



