DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – “आजची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, तुम्ही नव्या प्रतिनिधी भारताचे अँबेसेडर आणि देशाचे भविष्य आहात. आपल्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि उपलब्ध संधींचा विचार करून योग्य करिअरची निवड करा,” असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी विद्यार्थ्यांना केले.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता तथा उपक्रम समन्वयक प्रशांत भागवत आणि डॉन बॉस्को स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयुक्त गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत बदलत्या काळातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
“करिअर समुपदेशन ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. पारंपरिक क्षेत्रांबरोबरच आज जगभरात अनेक नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअरच्या चौकटीत न राहता बदलत्या काळातील संधींचाही विचार करावा,” असे गोयल यांनी सांगितले.
आजची पिढी ‘इनोव्हेटिव्ह, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह आणि व्होकल’ असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेला योग्य दिशा देण्याची गरज व्यक्त केली. करिअर निवडताना आपली आवड, क्षमता आणि उपलब्ध संधी यांचा समतोल विचार करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देश, राज्य आणि शहरासाठी योगदान द्या
महापालिकेचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांनी देश, राज्य आणि आपल्या शहरासाठी काहीतरी चांगले करण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन केले. आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार करिअरची दिशा निश्चित करताना समाजाप्रती असलेली जबाबदारीही लक्षात घ्यावी. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यात समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
‘लाईफमध्ये चॅलेंज स्वीकारा’
केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागातील वरिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवांमधील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. “लाईफमध्ये चॅलेंज स्वीकारा,” असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांनी मोठी ध्येये निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
रेडकर यांनी UPSC, MPSC, नागरी सेवा परीक्षा, IAS, IPS, IRS, NDA, CDS यांसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांतील करिअरच्या संधींची माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही करिअर समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या आवडी आणि क्षमता समजून घेऊन त्यांच्या करिअर निवडीमध्ये पालकांनी सकारात्मक भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रीय आस्थापनांमध्ये तुलनेने कमी प्रमाणात दिसत असल्याची खंत व्यक्त करत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवांसह विविध क्षेत्रांत जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रेडकर यांनी केले. हे त्यांचे ४२८वे व्याख्यान असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
विविध शाळा-महाविद्यालयांत उपक्रम
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध पर्यायांची माहिती देणे आणि योग्य क्षेत्र निवडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता. येत्या काळात कल्याण-डोंबिवलीतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्येही अशा मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रम समन्वयक प्रशांत भागवत यांनी दिली.
यावेळी आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, अतिरिक्त शहर अभियंता तथा कार्यक्रम समन्वयक प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, शिक्षण अधिकारी विजय सरकटे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण देशपांडे, महेंद्र वाकपैंजण तसेच डॉन बॉस्को शाळेचे डॉमिनिक सर, शिक्षक आणि दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



