DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण /प्रतिनिधी -कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार ठाकरे परिसरात उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या स्मारकाची बाह्य वास्तू आकर्षक असली तरी अंतर्गत भागाची मात्र दूवस्था झाल्याचे समोर आले आहे.
स्मारकाच्या आतील भागातील सिलिंग काही ठिकाणी तुटले असून पावसाचे पाणी छतातून मुरत आहे. हे पाणी भिंतींमध्ये झिरपत असल्याने भिंतीवरील प्लास्टर आणि रंग निखळू लागला आहे. तसेच अनेक ठिकाणी भिंतींची झीज होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, स्मारकाची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात यावी यासाठी माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीशी निगडित असलेल्या या स्मारकाची तातडीने दुरुस्ती करून योग्य पद्धतीने देखभाल करण्यात यावी, अशी मागणी सचिन बासरे यांनी केली आहे.
- September 24, 2026



