DESK MARATHI NEWS NETWORK
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे- SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरावलोकनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र Aनवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना महाराष्ट्राची’ मोर्चासाठी डोंबिवलीतून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मनसैनिकांनी हातात ‘SIR रद्द करा’ असे फलक घेत निवडणूक आयोग आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मनसैनिकांनी मोठ्या संख्येने मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना राजू पाटील यांनी मतदारांच्या अधिकारांचा आणि जनतेच्या मताचा अपमान होत असल्याचा आरोप केला. सर्व मतदारांनी या मुद्द्यावर रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी यासंदर्भात अनेक पत्रे दिली आहेत, मग यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
SIRच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असेल आणि त्याच्या आधारे निवडणुका झाल्या असतील, तर त्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी राजू पाटील यांनी केली. आपल्या मतदारसंघात २ लाख ५५ हजार मतांची नोंद झाली असून, त्यापैकी ९७ टक्के मतदार स्थानिक नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
हा प्रकार केवळ निवडणूक आयोगापुरता मर्यादित नसून मोदी सरकारच्या पाठबळाने हा घोळ झाल्याचा गंभीर आरोप राजू पाटील यांनी केला. जनआंदोलनासमोर सरकारला झुकावे लागते, हे देशाने यापूर्वी पाहिले आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीतून शेकडो मनसैनिक ट्रेनने मुंबईकडे रवाना झाल्याने रेल्वे स्थानक परिसरात काही काळ मनसेच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.



