DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/ प्रतिनिधी – सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने “रक्त नाड्यांमध्ये वाहू द्या, नाल्यांमध्ये नको” या बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या उद्घोषाला कृतीत उतरवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी मुंबई महानगर प्रदेशात उल्हासनगर आणि गोरेगाव येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये एकंदर 394 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची शिकवणूक जीवनात उतरवत मानवीयतेचा आदर्श समोर ठेवत संत निरंकारी सत्संग भवन, गोल मैदान, उल्हासनगर येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 75 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 42 पुरुष तर 33 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. रेडक्रॉस सोसायटी मार्फत या शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यात आले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या उल्हासनगर तसेच आजुबाजूच्या शाखांमधील निरंकारी भक्तगणांनी रक्तदान केले.
मिशनचे स्थानिक सेक्टर संयोजक किशन नेनवाणी आणि सेवादल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निरंकार ईश्वराच्या प्रति प्रार्थना करत सतगुरुंच्या जयघोषा द्वारे या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. मिशनच्या डोंबिवली झोनचे झोनल इंचार्ज रावसाहेब हसबे यांच्यासह सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे या शिबिराला आवर्जून उपस्थित होते.
शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्यांमध्ये आमदार सुलभा गायकवाड, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक भुल्लर महाराज व जमनादास परसवानी, माजी आमदार सुरेश कलानी, झुलेलाल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त लीलाराम मूलचंदानी, ज्येष्ठ पत्रकार ताराचंद जमनानी आदिंचा समावेश होता. या मान्यवरांनी निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले.
संत निरंकारी सत्संग भवन, संत निरंकारी उद्यान, वासरी हिल, गोरेगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये गोरेगांव, मालाड, वासरी हिल, संतोष नगर, गोविंद नगर, बिंबिसार नगर तसेच मालवणी आदि परिसरातील 319 निरंकारी भक्तगणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने 228 युनिट तर नायर हॉस्पिटलच्या रक्तपेढीने 91 युनिट रक्त संकलित केले.



