DESK MARATHI NEWS NETWORK.
अकोला/प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल.
तो म्हणजे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न आहे.याचा फायदा अमित शाह, भाजप घेईल. चिन्ह गोठल्यानंतर हे आमदार, खासदार भाजपाकडे पळतील. कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी फायदा भाजपचा आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.अकोला येथील यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्ह विवाद, निवडणूक आयोग आणि न्यायालयाचे अधिकार क्षेत्र तसेच मराठा व ओबीसी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, मध्यंतरी भाजपने पक्ष फोडाफोडी सुरू केली होती, ती जंतरमंतर वरील आंदोलनामुळे त्याला आळा बसला होता. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आमदार, खासदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात दिसेल.
कायदेशीर मुद्द्यांवर प्रकाश टाकताना ॲड. आंबेडकरांनी सांगितले की, राजकीय पक्षांच्या वादात मूळ कायदेशीर क्षेत्राचा प्रश्न डावलला जात आहे. सादिक अली खटल्याच्या वेळी राजकीय पक्षांची नोंदणी सक्तीची नव्हती आणि ते केवळ एक असोसिएशन म्हणून कार्यरत होते, त्यामुळे निवडणूक आयोगाला निर्णय देण्याचा अधिकार होता. मात्र, १९८९ मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करून कलम २९ (अ) समाविष्ट करण्यात आले, ज्यामुळे राजकीय पक्षांचे कायदेशीर अस्तित्व निर्माण झाले. नागरी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र कायद्याने काढून घेतलेले नसताना, राजकीय पक्षांमधील अंतर्गत भांडणे सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसून नागरी न्यायालयांनाच आहे. निवडणूक आयोगाला नागरी अधिकार क्षेत्र नसतानाही अशा प्रकारे निर्णय दिले जाणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही.
दुसऱ्या बाजूला, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी नमूद केले की, जरांगेंनी आंदोलनाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली असली, तरी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनीही प्रति आव्हानाची भूमिका घेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत घडलेल्या घटनांनंतर आता संपूर्ण ओबीसी समाज आणि सर्व ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात का?, हा मोठा प्रश्न आहे. आगामी काळात ओबीसी मतांचे महत्त्व लक्षात घेता जरांगेंना पूर्वी पाठिंबा देणारे घटक त्याच ताकदीने सोबत राहतील का, यावरच मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरेल आणि याबाबतचा अंतिम निर्णय जनता व मतदारच करतील.



