DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत होर्डिंगच्या अहवालावरून काँग्रेसच्या गटनेत्या तथा नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. दोन्ही नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने काही काळ सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.
होर्डिंगसंदर्भातील अहवालावर चर्चा सुरू असताना कांचन कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दीपेश म्हात्रे यांनी केलेल्या हस्तक्षेपावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आपल्याला कधी बोलायचे आणि कधी गप्प बसायचे, हे कोणी ठरवू नये, अशी भूमिका घेत कांचन कुलकर्णी संतापल्या.
सभागृहातील वातावरण तापल्यानंतर कांचन कुलकर्णी यांनी “कधी बोलायचं आणि कधी गप्प बसायचं हे त्यांनी ठरवू नये”, असे सुनावत सभात्याग केला. या प्रकारामुळे महासभेतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.होर्डिंगच्या अहवालाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद वैयक्तिक शाब्दिक संघर्षापर्यंत पोहोचल्याने महासभेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.



