DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याण-डोंबिवली महापालिकेतील गट-क आणि गट-ड संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे सुधारीत सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती सेवा योजनेचा लाभ लागू झाल्यानंतरही त्याच्या फरकाची रक्कम अनेक कामगारांना मिळालेली नव्हती. अखेर या फरकाच्या रकमेचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल २८०० कामगारांना सुमारे ४० कोटी रुपयांच्या फरकाच्या रकमेचा लाभ मिळणार आहे.
लाभाच्या फरकाची रक्कम मिळावी यासाठी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर ३ सप्टेंबर रोजी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर आयुक्तांनी फरकाची रक्कम देण्यास मान्यता देत संबंधित आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फरकाच्या रकमेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या निर्णयाचा थेट लाभ महापालिकेतील सुमारे २८०० कामगारांना होणार असून त्यामध्ये जवळपास ६०० सेवानिवृत्त कामगारांचा समावेश आहे. उर्वरित कामगार सध्या महापालिका सेवेत कार्यरत आहेत.
म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, कार्याध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष सुरेश तेलवणे, सुनील पवार आणि सरचिटणीस सचिन बासरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या मागणीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने कामगारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
फरकाची रक्कम मिळण्याचा निर्णय झाल्याने केडीएमसीतील २८०० कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून कामगारांनी म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे आभार व्यक्त केले आहेत.
- September 17, 2026



