DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी गणेशोत्सवासह विविध सण-उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजात वाजविण्यात येणाऱ्या डीजेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सहयोग सामाजिक संस्थेने कल्याणमध्ये डीजेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी यासंदर्भात कल्याणच्या डीसीपींना पत्र देत कारवाईची मागणी केली.
डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे विशेषतः वृद्ध नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. सततच्या मोठ्या आवाजामुळे झोपेचा त्रास, मानसिक ताण तसेच श्रवणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे संस्थेने पत्रात नमूद केले आहे.
गणेशोत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये ध्वनिक्षेपक व डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे उत्सव साजरे करताना ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशी मागणीही संस्थेने केली आहे.
उत्सव साजरे करण्यास आमचा विरोध नाही; मात्र त्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होता कामा नये. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी भूमिका विजय भोसले यांनी व्यक्त केली.
- September 2, 2026



