DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ४५० ते ५०० अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी यापूर्वी केला होता. या अनधिकृत होर्डिंग्जमुळे महापालिकेचा जवळपास १० कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.
गेल्या वर्षी पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली परिसरात होर्डिंग कोसळण्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिनय गोयल यांच्याकडे दीपेश म्हात्रे यांनी तक्रार करत अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्ज विरोधी समितीची नुकतीच बैठक पार पडली.
या बैठकीत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्या दिवसापासून ही होर्डिंग्ज उभारण्यात आली आहेत, त्या दिवसापासूनचा दंड संबंधित मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय होर्डिंग्जचे मालकी हक्क ज्यांच्या नावावर आहेत, त्यांच्यावर लवकरच एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी दिली.



