DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर आज ठेकेदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेची विविध विकासकामे पूर्ण करूनही ठेकेदारांना त्यांच्या कामाची देणी मिळालेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महापालिकेची कामे पूर्ण केल्यानंतरही बिले अदा न झाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ठेकेदारांकडे काम करणारे कामगार तसेच साहित्य पुरवठा करणारे सप्लायर पैशांसाठी सतत तगादा लावत आहेत. त्यामुळे ठेकेदारांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून, अनेकांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
“आम्ही सरकारची आणि महापालिकेची कामे केली आहेत. आमच्या मेहनतीचे पैसे सरकारने आम्हाला द्यावेत,” अशी मागणी ठेकेदारांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून देणी रखडल्याने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने आणि महापालिका प्रशासनाने तातडीने थकीत बिले अदा करावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
ठेकेदार संघटनेच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० ते १५० ठेकेदारांची तब्बल २०० कोटी रुपयांची देणी सरकारकडे/महापालिकेकडे थकीत आहेत. या थकीत रकमेमुळे ठेकेदारांना कामगारांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची देणी तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण झाले आहे.
यावेळी आंदोलकांनी असा गंभीर आरोपही केला की, आर्थिक देणी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे काही ठेकेदारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ठेकेदारांची थकीत देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, थकीत बिलांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ठेकेदार संघटनेने दिला आहे.



