DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची आणि डांबरीकरणाची मोहीम राबविण्यात आली. मात्र, या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पिंगारा पाइपलाइन रोडवरील रस्त्याची अवस्था आणि खड्डे बुजविण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेत शिवसेना रुग्णसेवक अमित कोळेकर यांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यात बसून प्रशासनाचा निषेध केला.
रस्त्याची दुरवस्था दाखवून देत कोळेकर यांनी संबंधित कंत्राटदार तसेच महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात खड्ड्यांमध्ये योग्य पद्धतीने डांबर आणि खडीचा वापर करण्यात आला आहे का, कामाचा दर्जा तपासला जातोय का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
विशेष म्हणजे, या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, ‘रस्ता मंजूर आहे, त्यामुळे डांबरीकरण करता येणार नाही’, असे उत्तर मिळाल्याचा दावा अमित कोळेकर यांनी केला. त्यामुळे रस्ता मंजूर होईपर्यंत नागरिकांनी खड्ड्यांमधूनच प्रवास करायचा का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘रस्ता मंजूर आहे, तो मंजूर झाल्यानंतर होईल; मात्र आज नागरिकांच्या जीविताला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे, त्याचे काय?’ असा प्रश्न उपस्थित करत कोळेकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा वाढते. अशा परिस्थितीत मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे व्यवस्थित बुजवणे आणि रस्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. मात्र, केवळ खड्डे बुजविल्याचे दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट काम केले जात असेल तर त्याची जबाबदारी निश्चित कोणाची, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महापालिकेकडून रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. नागरिकांकडून विविध प्रकारचे कर वसूल केले जात असताना त्यांना सुरक्षित आणि चांगले रस्ते मिळणे अपेक्षित आहे. मात्र, जर खड्डे बुजविण्याचे कामही निकृष्ट पद्धतीने होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कर भरायचा तरी कशासाठी? असा सवाल अमित कोळेकर यांनी उपस्थित केला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या कामांची पाहणी करून निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



