DESK MARATHI NEWS NETWORK
कल्याण /प्रतिनिधी -कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेली कल्याण-डोंबिवली महापालिकेची मालमत्ता अत्यंत कमी भाडे दराने दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिल्याचा आरोप करत मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी आक्षेप घेतला आहे. बाजारभावाचा योग्य अभ्यास न करता दोन वाणिज्य गाळे भाड्याने देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
सहजानंद चौक परिसर हा कल्याण पश्चिमेतील मोक्याचा आणि वर्दळीचा भाग मानला जातो.
या ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या इमारतीतील दोन वाणिज्य गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने निविदा मागविली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेसमोर ठेवण्यात आला होता.मात्र, या प्रस्तावाला मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी विरोध केला. आपल्या आक्षेपाची मांडणी करण्यापूर्वीच आपल्याला महासभेत बोलण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला. त्यानंतर हा विषय महासभेत मंजूर करण्यात आला.
म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार, सहजानंद चौकातील या दोन गाळ्यांसाठी वर्षाला केवळ ४१ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. जीएसटीसह हे वार्षिक भाडे सुमारे ४८ हजार रुपये होते. हे दोन्ही गाळे तब्बल दहा वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत.
मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या मालमत्तेसाठी सध्याच्या बाजारभावानुसार भाडे निश्चित करणे आवश्यक होते. मात्र, अधिकाऱ्यांनी परिसरातील बाजारमूल्य आणि संभाव्य भाडे याची योग्य शहानिशा केली नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे दीर्घकाळासाठी महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणी महापालिका आयुक्तांकडे दाद मागणार असून, मालमत्तेच्या भाडे दराची फेरतपासणी करण्याची मागणी करणार असल्याचे प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे सहजानंद चौकातील महापालिकेची मालमत्ता कमी भाड्याने देण्याचा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.



