DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील बल्याणी परिसरात एका विद्यार्थ्याला लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.
मुलगा राहत असलेल्या परिसरातील त्यांच्या नातेवाईकाची तपासणी करुन त्यांचे नमुने गोळा केल्याची माहिती देखील डॉ. शुक्ल यांनी दिली आहे.
दरम्यान मुलाचे चुलते प्रभू भगत यांनी महापालिका मुख्यालयात आज दुपारी धाव घेतली. भगत यांनी सांगितले की, ते बल्याणी परिसरात पोलिस पाटलाचे काम करतात. त्यांच्या पुतण्याला लेप्टोची लागण झाली आहे. त्याला कल्याण स्टेशन परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मात्र बल्याणी परिसरात भूमाफियांनी बेकायदा चाळींचे बांधकाम केले आहे. या बेकायदा चाळींमुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुंटला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी त्यांच्या शेतात शिरते. याच तुंबलेल्या पाण्यातून त्यांच्या पुतण्याला लेप्टोची लागण झाली आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. महापालिका प्रशासनाने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप भगत यांनी केला आहे.



