DESK MARATHI NEWS NETWORK.
औरंगाबाद/प्रतिनिधी – फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांशी Gen Z पिढीचा संवाद घडवून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जय भीम Gen Z’ या टाऊनहॉल कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली.
यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “जोपर्यंत या देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आम्ही आरक्षण सोडणार नाही. काय करायचे ते करून घ्या.” Gen Z पिढी राजकीय होत असून स्वतःच्या न्याय आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरत आहे. या पिढीच्या राजकीय सहभागाचे स्वागत केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर यांनी आरक्षणविरोधी आंदोलन, सोशल मीडिया पोस्ट आणि जातीय वक्तव्यांचा संदर्भ दिला. फुले-शाहू-आंबेडकरवादी तरुणांनी या परिस्थितीमुळे निराश होऊ नये, त्यांच्यासोबत आपण खांद्याला खांदा लावून संघर्ष करू, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान विविध फोटो, व्हिडीओ आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून देशातील जातीय विषमता आणि आरक्षणाच्या गरजेबाबत भूमिका मांडण्यात आली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आधार घेत सामाजिक न्यायाच्या लढ्यात तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमात शहराच्या नामांतराचा मुद्दाही उपस्थित झाला. एका तरुणाने ‘छत्रपती संभाजीनगर’ असे अधिकृत नामकरण झालेले असताना आपण आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते ‘औरंगाबाद’ असा उल्लेख का करतात, असा सवाल सुजात आंबेडकर यांना केला. त्यावर त्यांनी नामांतराच्या राजकारणावर भाष्य करत, पुणे शहराचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज नगर’ करण्याचा प्रस्ताव मांडला आणि असा बदल पुण्यातील ब्राह्मणवादी घटकांना मान्य होईल का, असा प्रतिप्रश्न केला.
यावेळी आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चारित्र्याबाबत करण्यात आलेल्या कथित बदनामीवरही सुजात आंबेडकर यांनी भाष्य केले.
‘जय भीम Gen Z’ कार्यक्रमात अनेक तरुण-तरुणींनी सुजात आंबेडकर यांना विविध सामाजिक, राजकीय आणि आरक्षणाशी संबंधित प्रश्न विचारले. त्यांनी या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. डिजिटल युगातील Gen Z पिढीचे प्रश्न, विचार आणि राजकीय दृष्टिकोन समजून घेऊन त्यांना आंबेडकरी विचारसरणी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीशी जोडणे हा या टाऊनहॉलचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमामुळे मराठवाड्यातील युवा वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



