DESK MARATHI NEWS NETWORK,
कल्याण/प्रतिनिधी कल्याण पूर्वेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला असून, संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कल्याण पूर्वेच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनीही डॉक्टरांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
ऋतुजा दिनेश पाटील यांच्यावर गेल्या सात महिन्यांपासून शक्तीधाम रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती पाहता नॉर्मल डिलिव्हरी होईल, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
मात्र, प्रसूतीच्या वेदना वाढत असतानाही डॉक्टरांकडून अपेक्षित उपचार होत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. महिलेची प्रकृती आणि परिस्थिती पाहता गरज भासल्यास सिझेरियन करण्याची विनंती डॉक्टरांकडे केल्याचा दावाही नातेवाईकांनी केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास बाळाच्या हृदयाचे ठोके कमी झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांची धावपळ सुरू झाली, असा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर महिलेवर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, उपचार सुरू असतानाच बाळाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान, कल्याण पूर्वेच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनीही या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे रुग्णालयातील डॉक्टरांच्या भूमिकेबाबत आयुक्तांची भेट घेऊन जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



