DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – राज्यभरात ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष सातत्याने पाहायला मिळत असताना, कल्याणमध्ये मात्र या दोन्ही गटातील नगरसेवकांच्या मैत्रीचे अनोखे चित्र समोर आले आहे. कल्याण पूर्वेतील द्वारली परिसरात ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात दोन्ही शिवसेनांमध्ये कट्टर राजकीय वैराचे वातावरण असताना, कल्याणमध्ये मात्र वेगळेच समीकरण पाहायला मिळाले. उद्घाटन कार्यक्रमावेळी दोन्ही गटातील कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे अशी युती कुठेही नाही अशा चर्चांना उधाण आले.
याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, मला उद्घाटनासाठी आमंत्रण देण्यात आले होते. निलेश खंबायत यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
तर ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांनीही या कार्यक्रमाला कोणताही राजकीय रंग नसल्याचे स्पष्ट केले. आमच्यात कोणतेही पक्षभेद नाहीत. कुणाल पाटील यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. मोठा भाऊ म्हणून मी त्यांना उद्घाटनासाठी बोलावले. याचा दुसरा कोणताही अर्थ काढू नये,असे त्यांनी सांगितले.राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध कायम असल्याचे हे उदाहरण सध्या कल्याणमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.



