नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – संत निरंकारी मिशनच्या वतीने डोंबिवली झोन अंतर्गत कल्याण ब्रांच तर्फे कल्याण पूर्वेतील संत निरंकारी सत्संग भवन रामनगरी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 235 निरंकारी भक्तांनी रविवारी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यामध्ये 192 पुरुष तर 43 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. संकल्प रक्तपेढी कल्याण आणि जे. जे. महानगर रक्तपेढी मुंबई यांनी रक्त संकलन केले.
संत निरंकारी मंडळाच्या सेवादल विभागाचे डोंबिवली क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे यांच्याहस्ते दीप प्रज्वलीत करून, नामस्मरण करत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला कल्याण डोंबिवली महानगरपालीकेचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी निरंकारी मिशनच्या मानवतावादी सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कल्याणसह आजूबाजूच्या परिसरातील निरंकारी भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने या शिबिरात भाग घेतला. कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल सदस्यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.
याच दिवशी मिशनच्या वडाळा ब्रांच मार्फत संत निरंकारी सत्संग भवन, नाडकर्णी पार्क, वडाळा येथे आयोजित केलेल्या शिबिरात 63 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. या शिबिरात संत निरंकारी रक्त पेढीने रक्त संकलन केले. मंडळाचे स्थानिक मुखी रमाशंकर जयस्वाल यांच्या देखरेखी खाली हे शिबिर पार पडले.