DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण प्रतिनिधी :-कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवात दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत आहेत. रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ल्यावर येत देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते दुर्गाडी देवीची आरती करण्यात आली.राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने यंदा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला. शिवसेनेचे नगरसेवक, रवी पाटील फाउंडेशन, किल्ले दुर्गाडी समिती, परिवहन कर्मचारी कामगार संघटना आणि विविध संस्थांच्या वतीने लाखो रुपयांचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
किल्ले दुर्गाडीचे अध्यक्ष आणि शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी यावेळी सांगितलं की, दुर्गाडी नवरात्रोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक वातावरणात देवीचा जागर सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या माध्यमातून जमा झालेली मदत डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आली असून, फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे



