DESK MARATHI NEWS NETWORK
मुंबई/प्रतिनिधी -कल्याण शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नवीन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख नसरू शेख (मोहने-टिटवाळा) आणि अल्पसंख्याक ठाणे जिल्हा महासचिव असलम सोयान यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत या पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.
या पक्षप्रवेशामुळे कल्याण शहर आणि परिसरात काँग्रेस पक्षाला संघटनात्मक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नवीन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उबाठा गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे कल्याणमधील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, तसेच आगामी काळात काँग्रेसची स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद कितपत वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
- October 24, 2026



