DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – दिल्लीमध्ये वकिलांवर आणि जन-झी पिढीवर झालेल्या कथित अमानुष अत्याचारांच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीतील प्रगतिशील आणि समान विचारधारा असलेल्या वकिलांनी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. कल्याण पश्चिमेतील शिवाजी महाराज चौक येथून ‘स्वराज्य ते संविधान मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये कल्याण फौजदारी न्यायालय वकील संघटनेच्या सदस्यांसह अनेक वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संविधानाचे संरक्षण, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना न्याय मिळावा, या प्रमुख उद्देशाने हा मार्च काढण्यात आला. शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या आंदोलनादरम्यान वकिलांवरील अत्याचार तातडीने थांबवावेत, जन-झी पिढीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये आणि संविधानाचे संरक्षण करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. दिल्लीतील घटनांमध्ये वकिलांवर आणि जन-झी पिढीवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
याशिवाय, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणीही या मार्चच्या माध्यमातून करण्यात आली. संविधानिक मूल्यांचे रक्षण आणि लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकता कायम राखण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या मार्चमध्ये सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, विविध संघटना, विद्यार्थी संघटना आणि संविधानप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार विविध समान विचारधारा असलेल्या घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला.



