DESK NEWS MARATHI NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचे निर्बंध जाहीर करण्यात आले असताना, दुसरीकडे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडण्या, पाण्याची गळती तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून होणारा अनधिकृत पाणीवापर यांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष तथा महानगरपालिका माजी नगरसेवक हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पाणीटंचाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांवर पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्बंध लादले जात असताना, दुसरीकडे अनधिकृत पाणीवापर करणाऱ्यांवरही तितक्याच कठोरपणे कारवाई होणे आवश्यक आहे. कार वॉशिंग सेंटर, सर्व्हिस सेंटर, विविध व्यावसायिक आस्थापना आणि इतर ठिकाणी पाण्याचा वापर अधिकृत मर्यादेत होत आहे की नाही, याची महापालिका प्रशासनाने तातडीने तपासणी करावी, अशी मागणी पाटील यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जलवाहिन्यांमधून अनधिकृतरीत्या घेतलेल्या नळजोडण्या शोधून त्या तात्काळ खंडित कराव्यात. तसेच मुख्य जलवाहिन्या, वितरण वाहिन्या आणि इतर पाणीपुरवठा यंत्रणांमधील गळती शोधून तिची तातडीने दुरुस्ती करावी. यामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यास मदत होईल आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करता येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचे व्यापक व सविस्तर वॉटर ऑडिट करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या ऑडिटमध्ये महानगरपालिकेला उपलब्ध होणारे एकूण पाणी, जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा, विविध भागांत वितरित होणारे पाणी, प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचणारे पाणी, जलवाहिन्यांमधील गळतीमुळे होणारे नुकसान आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाणारे पाणी यांचा सविस्तर आढावा घ्यावा.
वॉटर ऑडिट पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल, पाणीपुरवठ्याची आकडेवारी, पाणीगळतीचे प्रमाण आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सार्वजनिक करावी. यामुळे नागरिकांना शहरातील पाणीपुरवठ्याची वास्तविक परिस्थिती समजेल आणि प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता येईल.
पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरणे आवश्यकच आहे,मात्र त्याचवेळी प्रशासनानेही पाण्याचा अपव्यय, अनधिकृत नळजोडण्या आणि बेकायदेशीर पाणीवापर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. केवळ नागरिकांवर पाणी कपातीचे निर्बंध लादून चालणार नाही, तर संपूर्ण महापालिका क्षेत्राचे वॉटर ऑडिट करून पाण्याचे योग्य नियोजन आणि न्याय्य वितरण सुनिश्चित करणे गरजेचे आहे, अशी भूमिका हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी मांडली.
महापालिका प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन अनधिकृत पाणीवापर करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करावी, पाणीगळती रोखावी आणि संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचे वॉटर ऑडिट करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.



