DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण प्रतिनिधी : कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात एका तरुणाला घरी बोलावून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, त्याचा सुमारे ५० हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन १६ प्रो हिसकावून घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रणव महाजन, अजय राठोड, शीतल घोलप आणि योगेश घोलप यांच्यावर मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर येथील मारुती सुझुकी शोरूममध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सुशांतला १९ ऑक्टोबरच्या रात्री त्याची वर्गमैत्रीण श्रुती घोलप हिचा फोन आला होता. यावेळी प्रणव महाजन याने फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुशांतला दुर्गाडी चौकात बोलावण्यात आले. पुढे तो रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अहिल्याबाई चौकातील श्रुतीच्या घरी गेला.
सुशांतच्या तक्रारीनुसार, घरी पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रणव महाजन याने लाकडी वस्तूने डाव्या डोळ्यावर आणि उजव्या कानावर मारल्याचा आरोप आहे. अजय राठोड याने गळा दाबल्याचे, शीतल घोलप हिने पट्ट्याने पाठीवर आणि पोटावर मारहाण केल्याचे, तर योगेश घोलप याने चेहऱ्यावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारादरम्यान सुशांतचा सुमारे ५० हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन १६ प्रो हिसकावून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती डायल ११२ वर मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी सुशांतला उपचारासाठी कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले.
या घटनेमुळे कल्याण पश्चिम परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी होणे बाकी आहे.
- October 30, 2026



