DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण /प्रतिनिधी – खेळ कोणताही असो, जिद्द आणि मेहनत असेल तर मैदान गाजवण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. याच विचारातून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा क्रीडामहोत्सव रंगणार असून यंदा या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघातीलच नव्हे, तर ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील खेळाडूंनाही सहभागी होता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंपासून ते अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला खासदार नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे तसेच कल्याण, ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील सर्व आमदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व महापालिकांचे महापौर, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक पदाधिकारी यांच्या सहकार्याने यंदाचा उपक्रम अधिक व्यापक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आज अनेक तरुणांमध्ये खेळाची आवड, गुणवत्ता आणि जिंकण्याची जिद्द आहे; मात्र योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि संधीअभावी त्यांच्यातील गुणवत्ता अनेकदा स्थानिक पातळीपुरतीच मर्यादित राहते. हीच बाब लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडासंग्रामला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. हजारो खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपली क्रीडाकौशल्ये सादर केली होती. यंदा त्याच उत्साहाला अधिक मोठे स्वरूप देत स्पर्धेची व्याप्ती संपूर्ण ठाणे जिल्ह्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ हून अधिक ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
यंदाच्या क्रीडासंग्रामचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल २८ विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. पारंपरिक मैदानी खेळांपासून ते आधुनिक आणि वैयक्तिक कौशल्यांवर आधारित खेळांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपल्या आवडीच्या खेळात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, केवळ क्रिकेट किंवा लोकप्रिय खेळांपुरते मर्यादित न राहता कुस्ती, मल्लखांब, तिरंदाजी, जलतरण, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, जिम्नॅस्टिक्स अशा विविध क्रीडाप्रकारांनाही या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यापूर्वी टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रेसिडेंट कप इंडिया २०२६’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, हा त्यामागील उद्देश होता. या उपक्रमानंतर आता पुन्हा एकदा खासदार क्रीडासंग्रामच्या माध्यमातून विविध खेळांतील खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवरील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांच्यासाठी भविष्यातील क्रीडा संधींचे दरवाजेही खुले होण्यास मदत होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी आकर्षक पारितोषिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंना केवळ स्पर्धेत सहभागी होण्याचीच नव्हे, तर आपल्या खेळातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर पारितोषिके जिंकण्याचीही संधी मिळणार आहे. यंदा हजारो खेळाडूंसह मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी आणि प्रेक्षकांनीही या क्रीडामहोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खेळाडूंना नोंदणी करणेही अगदी सोपे असणार आहे. दिलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून खेळाडूंना आपली नोंदणी करता येणार आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित खेळाडूंना आपला ‘खासदार संग्राम पास’ मिळवता येईल. स्पर्धेची अधिकृत माहिती, नोंदणीविषयक तपशील आणि पुढील अपडेट्स खासदार क्रीडासंग्रामच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तर मग तयारीला लागा, मैदान तुमचे, खेळ तुमचा आणि कौशल्य दाखवण्याची संधीही तुमचीच. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या क्रीडासंग्राममध्ये सहभागी होऊन आपली चमक दाखवावी आणि या क्रीडामहोत्सवाचा भाग व्हावे, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*खासदार क्रीडासंग्राममध्ये या खेळांचा समावेश.*
खासदार क्रीडासंग्रामच्या माध्यमातून अॅथलेटिक्स, कॅरम, मल्लखांब, खो-खो, कबड्डी, जलतरण, बास्केटबॉल, कुस्ती, जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन, तिरंदाजी, लाठीकाठी, रस्सीखेच, टेबल टेनिस, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, तायक्वांदो, रोलर स्केटिंग, बॉक्स क्रिकेट, हँडबॉल, व्हॉलीबॉल, जुडो, पिकल बॉल, रग्बी आणि रिंग टेनिस अशा विविध क्रीडाप्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विविध खेळांतील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि स्पर्धेत आपली चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
*स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अशी करा नोंदणी.*
खासदार क्रीडासंग्राममध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना पोस्टरवरील QR कोड स्कॅन करून नोंदणी करता येणार आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून OTP द्वारे लॉगिन करून आपल्या आवडीचा खेळ निवडता येईल. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून खेळाडूंना आपला ‘खासदार संग्राम पास’ मिळवता येणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती आणि पुढील अपडेट्स खासदार क्रीडासंग्रामच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर उपलब्ध असतील.



