DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – पावसाचा जोर नसतानाही उल्हास नदीच्या पाण्याला अचानक गढूळपणा कसा आणि कुठून आला, असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी शशिकांत दायमा यांनी उपस्थित केला आहे. नदीचे पाणी गढूळ झाल्याने नागरिकांच्या घरात होणारा पाणीपुरवठाही काही ठिकाणी गढूळ होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, संबंधित सरकारी यंत्रणांनी तातडीने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उल्हास नदी प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विविध पर्यावरण संस्थांकडून उपस्थित केला जात आहे. ‘मी कल्याणकर’ संस्थेचे नितीन निकम, उल्हास नदी बचाव कृती समितीचे रविंद्र लिंगायत आणि वालधूनी जल बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी नदी प्रदूषणाविरोधात सातत्याने पाठपुरावा केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून विविध सरकारी यंत्रणांकडे नदी प्रदूषण रोखण्यासाठी मागण्या करण्यात येत असल्याचे दायमा यांनी सांगितले.
दरम्यान, ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेकडून उल्हास नदीच्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवाद, त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा सुरू आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
बदलापूरजवळ एका संस्थेकडून नदीपात्रात भराव टाकून नदीपात्र बुजविल्याचा आरोपही पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी वर्ष उलटूनही दंडाची वसुली झालेली नसल्याचा दावा दायमा यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर उल्हास नदीच्या पाण्यात अचानक वाढलेला गढूळपणा गंभीर असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. पाण्यातील गढूळपणामुळे पाणी उपशावर आणि उपलब्ध पाण्याच्या प्रमाणावर परिणाम होत असून काही भागांत पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बदलापूर उपविभागाकडून नागरिकांना उपलब्ध पाणी उकळून आणि गाळूनच पिण्यासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नदीचे पाणी नेमके कोणत्या कारणामुळे गढूळ झाले, याचा तातडीने शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
बदलापूर, शिरगाव एमआयडीसी परिसरासह विविध ठिकाणांहून रसायने आणि सांडपाणी नदीत मिसळत असल्याचा आरोप दायमा यांनी केला आहे. तसेच नदीपात्रात होणारे मातीचे भरावही गढूळपणासाठी कारणीभूत ठरत असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित शासकीय यंत्रणांनी नदीच्या पाण्याची तपासणी करून गढूळपणाचे नेमके कारण शोधावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उल्हास नदीचे पाणी मोठ्या लोकसंख्येला पिण्यासाठी पुरवले जाते. प्रक्रिया केल्यानंतरही काही ठिकाणी पाणी गढूळ येत असल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे दायमा यांनी म्हटले आहे. नदी प्रदूषणाच्या या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.



