DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत सत्यशोधक समाज स्थापना दिनाचे औचित्य साधत २४ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात सत्यशोधक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले जन्मद्विशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती संयोजक डॉ. अजयकुमार लोखंडे यांनी दिली.
या परिसंवादात डॉ. दीपक गायकवाड, डॉ. लक्ष्मी साळवी आणि डॉ. प्रवीण बोरकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. दीपक गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचा संदर्भ देत शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत फुले यांनी मांडलेल्या विचारांची माहिती दिली. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी आजच्या काळातही महात्मा फुले यांचे विचार महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. लक्ष्मी साळवी यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांचे कार्य समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य आणि लेखन वाचण्याचे आवाहन केले. तसेच सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून न राहता अभ्यासपूर्ण वाचन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. प्रवीण बोरकर यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा संदर्भ देत समाजात एकोपा आणि सामाजिक समता निर्माण करण्यासाठी जातिभेदाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.
महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक प्रबोधन या विषयावर झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्य डॉ. सुचित्रा कामत होत्या. संस्थेचे सीईओ हर्षल लवंगारे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदेव यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
परिसंवादाला महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या परिसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषीविषयक विचारांची ओळख करून देण्यात आली.
- September 26, 2026
डोंबिवली के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात सत्यशोधक परिसंवाद संपन्न
Related Post
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026



