DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीतील दत्तनगर परिसरात ड्रग्ज सेवन केल्यानंतर एका तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे सेवन केल्यानंतर तरुण बेशुद्ध पडला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने डॉक्टरांना त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.
या घटनेनंतर डोंबिवलीतील ड्रग्ज विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तरुणाने काय सेवन केले होते आणि त्याची प्रकृती याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार रामनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात खुलेआम ड्रग्ज विक्री होत असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि तरुणांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री यांच्याकडे डोंबिवलीतील ड्रग्ज विक्रीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच ड्रग्जच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“तुम्हाला डोंबिवलीने भरभरून प्रेम दिलं, तुम्ही डोंबिवलीला वाऱ्यावर सोडून दिलं,” अशा शब्दांत हर्षद पाटील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
आता दत्तनगर येथील घटनेच्या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, तसेच डोंबिवलीतील कथित ड्रग्ज विक्रीविरोधात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



