DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीला गती दिली आहे. याच अनुषंगाने कल्याण–डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा कल्याण जिल्हा प्रभारी राजन भोसले साहेब प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. कल्याण–डोंबिवलीतील विविध भागांमध्ये नवीन ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती करत पक्षाची रचना नव्याने उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसने आगामी महापालिका निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. अलीकडेच इतर पक्षांत गेलेल्या काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यांवर टीका करत त्यांच्या कार्यकाळात संघटनेला मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे काँग्रेसची हानी झाली असल्याचे सांगत, आता संघटना नव्या जोमाने उभी राहत असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी आम आदमी पार्टी तसेच इतर पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. येत्या काळात विविध पक्षांतील पदाधिकारी व माजी नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
संघटनात्मक नियुक्त्यांच्या अनुषंगाने कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचार प्रमुखपदी माजी नगरसेविका सौ. रत्नप्रभा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच डोंबिवली विभागाच्या आगामी निवडणूक तयारीसाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते मामा पगारे यांची निवडणूक प्रचार समन्वयकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
पत्रकार परिषदेत वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, महापालिकेतील १२२ प्रभागांपैकी जवळपास सर्वच प्रभागांतून काँग्रेसकडे उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहेत. यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधारी पक्षांतील अनेक अनुभवी कार्यकर्तेही काँग्रेसच्या संपर्कात असून लवकरच ते पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेत देण्यात आले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी सांगितले की, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत काँग्रेस प्रभावी भूमिका बजावेल आणि येणाऱ्या काळात ‘किंगमेकर’ची भूमिका निश्चितपणे निभावेल. संघटनात्मक मजबुती, वाढता कार्यकर्ता वर्ग आणि जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.



