नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. पण नवी मुंबई महानगरपालिका एक अनोखा उपक्रम राबवत आहे. मतदान करण्यासोबत नागरिक सेल्फी स्टँड वर सेल्फी काढू शकतात. 20 मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असून यामध्ये प्रत्येक मतदाराने मतदान करून मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मतदार जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर करताना सध्याच्या सोशल मिडियाप्रेमी युगात लोकांमध्ये असलेली सेल्फी छायाचित्र काढण्याची आवड लक्षात घेता मतदार जनजागृतीचे सेल्फी स्टँड तयार करून ते महानगरपालिका मुख्यालयासह आठही विभाग कार्यालये तसेच ऐरोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वंडर्स पार्क, निसर्गोद्यान, मनपा रूग्णालये व इतर मनपा कार्यालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत. विष्णुदास भावे नाट्यगृहातही सेल्फी स्टँड ठेवण्यात आला असून तेथेही कलाकार आणि नाट्यरसिक यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेक कलावंतानी तर नाट्यगृहात प्रयोगासाठी आल्यानंतर नागरिकांना मतदान करण्याविषयी आवाहन करणारे रिल्स बनवून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.
महापालिका मुख्यालयातील सेल्फी स्टँडवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सेल्फी काढून नागरिकांना 20 मे रोजीच्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही बळकट करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून त्याकरिता संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हक्काने बजावावा असा संदेश आयुक्तांनी सेल्फीच्या माध्यमातून दिलेला आहे. नवी मुंबई नागरिकांनी या सेल्फी स्टँडवर आपले सेल्फी छायाचित्र काढून ते सोशल मिडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, व्हॉट्सॲप आणि इतर लोकप्रिय समाज माध्यमांतून प्रसारित करावे आणि स्वत: मतदान करावेच व इतरांनाही मतदान करण्याविषयी सेल्फीच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.



