- DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मधील टिळकनगर, पाथर्ली, अंबिकानगर आणि गोग्रासवाडी परिसरातील कचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराची उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये पोलखोल झाली. गेल्या सात-आठ दिवसांपासून परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याच्या तक्रारीनंतर उपायुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित यंत्रणेची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी सुमित एलको कंपनीला कामकाज सुधारण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला.
प्रभाग २७ मधील कचरा संकलन आणि साफसफाईचे काम सुमित एलको कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र, कंपनीकडून अपेक्षित पद्धतीने काम होत नसल्याने विविध भागांत कचरा साचत असल्याच्या तक्रारी नागरिक तसेच भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात येत होत्या. कर्मचाऱ्यांकडे गणवेश नसणे, मनुष्यबळाचे योग्य नियोजन न करणे आणि कोणत्या कर्मचाऱ्याने कोणत्या परिसरात काम करायचे याबाबत स्पष्ट व्यवस्था नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर प्रभागातील भाजप नगरसेवकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांना प्रत्यक्ष प्रभागात सरप्राईज व्हिजिट करण्याची विनंती केली. त्यानुसार डॉ. कोकरे यांनी सकाळी सुमारे ९.३० वाजता प्रभागाला भेट देत तब्बल दीड ते दोन तास विविध भागांची पाहणी केली.
पाहणीदरम्यान काही ठिकाणी कचरा संकलन, साफसफाई आणि वर्गीकरणाचे कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत उपायुक्तांनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर सुमित एलको कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांना तसेच व्यवस्थापकाला बोलावून कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
कंपनीला ४८ तासांचा अल्टिमेटम
प्रभागातील कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी कंपनीला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे कामात सुधारणा न झाल्यास कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सुमित एलको कंपनीकडे कंत्राट दिल्यानंतर प्रभागातील अनेक भागांत कचरा साचण्याच्या तक्रारी वाढल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. यापूर्वी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत प्रभागातील स्वच्छता व्यवस्थित होत होती. त्यामुळे सुमित एलकोचे कंत्राट तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता व्यवस्था राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, असे नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. काही सोसायट्यांमधील रहिवाशांना कचरा बाहेर न टाकता काही काळ घरातच ठेवण्याच्या सूचना द्याव्या लागत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. हा मुद्दा आगामी महासभेत मांडणार असल्याचे भाजप नगरसेवकांनी स्पष्ट केले.
गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याचाही प्रश्न ऐरणीवर
या पाहणीदरम्यान गोग्रासवाडी परिसरातील अनधिकृत गोठ्याचा प्रश्नही उपायुक्त डॉ. कोकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. गोठ्याच्या परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शेण साचल्याने दलदल निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक व्यक्ती अडकून पडल्याची घटना घडल्याचे सांगण्यात आले.
या समस्येबाबत यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला होता. यावेळी उपायुक्तांना परिस्थिती प्रत्यक्ष दाखवण्यात आली. तसेच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्यासमोरही नागरिकांनी आपली व्यथा मांडली. संबंधित अनधिकृत गोठा मालकाविरोधात महापालिकेच्या वतीने आवश्यक पोलिस तक्रार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या पाहणीवेळी भाजप नगरसेवक महेश पाटील, नगरसेविका मंदाताई पाटील, शिक्षण समिती सभापती तथा नगरसेवक अभिजित थरवळ, भाजप कल्याण जिल्हा सचिव तथा प्रभाग प्रभारी ॲड. मनोज प्रकाश घरत, संजय विचारे, माजी परिवहन समिती सदस्य संजय (अण्णा) राणे, युवा मोर्चाचे गोपाल देशपांडे, गणेश मगरे आदी उपस्थित होते.
प्रभागातील स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
- October 6, 2026
केडीएमसी कचरा कंत्राटदार सुमित एलकोच्या कामाची पोलखोल, कंत्राटदाराला ४८ तासांचा अल्टिमेटम
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



