DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – भिवंडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केला आहे. कुलकर्णी यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात भिवंडीतील पडघा पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपींचा जामीन न्यायालयाने नाकारला आहे. या पार्श्वभूमीवर सव्वालाखे यांनी कुलकर्णी यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.
या प्रकरणातील आरोपी पाटील हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून कांचन कुलकर्णी यांच्या जीविताला धोका आहे. कुलकर्णी यांना काही धोका झाल्यास त्याची जबाबदारी भाजपची असेल,” असा आरोप सव्वालाखे यांनी केला.
या प्रकरणात भाजपकडून आरोपींना मदत केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा जामीन नाकारला आहे. मात्र, भाजपला अद्याप या प्रकरणाचे गांभीर्य समजलेले नाही,” असे सव्वालाखे म्हणाल्या.
पीडित तरुणीच्या न्यायासाठी काँग्रेस तिच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणात भाजपच्या महिला नेत्यांनी मौन बाळगल्याची टीकाही त्यांनी केली.
महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या भाजपच्या महिला नेत्यांनी या प्रकरणात मात्र काहीही भूमिका घेतलेली नाही. काँग्रेसची गटनेता कांचन कुलकर्णी एकट्या पुढे आल्या आहेत,” असा दावा सव्वालाखे यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात कोणाचाही राजकीय दबाव न घेता निष्पक्षपणे कारवाई करावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही संध्या सव्वालाखे यांनी केली आहे.



