DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) चालविणे आणि देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, या निविदेतील अटी व शर्ती जाचक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन तरे यांनी केला आहे. या अटींमुळे नव्या कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार नसून ठराविक अनुभवी कंपन्यांनाच सहभाग घेता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
महापालिकेने महा-ई-टेंडरिंगच्या माध्यमातून ही निविदा प्रसिद्ध केली आहे. एसटीपी प्रकल्पाच्या संचालनासोबतच त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम या निविदेत समाविष्ट आहे. मात्र, निविदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या पात्रता निकषांमध्ये संबंधित कामाचा अनुभव तसेच यापूर्वी कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचा अनुभव आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या अटींमुळे नव्याने या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मर्यादित होत असल्याचे तरे यांनी म्हटले आहे. परिणामी निविदा प्रक्रियेत अपेक्षित असलेली व्यापक आणि निकोप स्पर्धा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.
महापालिकेच्या मोठ्या आर्थिक किमतीच्या कामांसाठी अधिकाधिक पात्र कंत्राटदारांना सहभागी होता यावे, यासाठी पात्रता निकषांचा पुनर्विचार करण्याची मागणी तरे यांनी केली आहे. निविदेतील जाचक अटी व शर्ती शिथिल करून निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निविदेतील पात्रता निकष सध्याच्या स्वरूपात कायम राहिल्यास पूर्वीपासून मोठ्या कामांचा अनुभव असलेल्या काही मोजक्या कंत्राटदारांनाच त्याचा फायदा होण्याची शक्यता असल्याचे तरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या निविदेकडे पारदर्शकता आणि स्पर्धेच्या दृष्टीने पाहून आवश्यक बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.निविदेतील अटी शर्ती नेमक्या कोणत्या कारणास्तव निश्चित करण्यात आल्या आहेत आणि त्यामागे महापालिका प्रशासनाची भूमिका काय आहे, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळणे अपेक्षित आहे.



