DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी-कल्याण-शीळफाटा मार्ग आणि शीळफाटा कल्याण फाटा जंक्शनवरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डोंबिवली शहराच्या वतीने शीळफाटा जंक्शन येथे जाहीर जनआंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाब विचारण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने मनसे सैनिक आणि स्थानिक नागरिक हातात फलक घेऊन उपस्थित होते.
सध्या कल्याण-शीळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सुरू असलेले मेट्रोचे काम, रस्त्याची अपुरी क्षमता, अवजड वाहनांची सातत्याने वाढती वर्दळ आणि अपुरे वाहतूक नियोजन यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोज प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रोजच्या या कोंडीमुळे नागरिकांचा अनेक तासांचा मौल्यवान वेळ रस्त्यावरच वाया जात आहे. याचा थेट फटका नोकरदार वर्ग, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना बसत आहे.
या आंदोलनादरम्यान मनसे आणि नागरिकांनी प्रशासकीय धोरणावर तीव्र आक्षेप घेतला. अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन, वेळेचे निर्बंध आणि वाहतूक नियंत्रण याबाबत प्रशासनाने कठोर आणि पारदर्शक धोरण राबवण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी सांगितले. काही ठराविक अवजड वाहनांना वाहतुकीत मुभा किंवा प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. “यामागे नक्की कोणाचा दबाव आहे? आणि वाहतूक नियोजन करताना सामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य का दिले जात नाही?” असा संतप्त सवाल करत प्रशासनाने याचा तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा जीवघेणा कोंडमारा करणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने आता तरी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. केवळ तात्पुरत्या किंवा वरवरच्या उपाययोजना न करता, यावर कायमस्वरूपी आणि ठोस तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. या आंदोलनात वाहतूक कोंडीने त्रस्त असलेले हजारो कल्याण-डोंबिवलीकर नागरिक स्वतःहून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- October 11, 2026
डोंबिवलीत वाहतूक कोंडीविरोधात मनसेचे तीव्र जनआंदोलन; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाब विचारण्यासाठी नागरिक रस्त्यावर
Related Post
न्युजरूम
महाराष्ट्र
- September 30, 2026
‘जोपर्यंत देशातील जातीयवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच
न्युजरूम
पर्यावरण
- September 26, 2026
उल्हास नदीच्या पाण्याला गढूळपणा; पर्यावरण प्रेमींचा संतप्त सवाल
कला/साहित्य
न्युजरूम
- September 26, 2026



