DESK MARATHI NEWS NETWORK
कल्याण / प्रतिनिधी -कल्याण न्यायालयात तब्बल 17 वर्षांपासून सुरू असलेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे मानहानी खटल्याचा आज निकाल लागला आहे 2009 च्या कल्याण लोकसभा निवडणुकीदरम्यान समोर आलेल्या कथित व्हिडिओ आणि सीडी प्रकरणातून हा खटला सुरू झाला होता. या प्रकरणात उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे आरोपी होते. कल्याण न्यायालयाने आज या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
व्हीओ :
2009 मध्ये कल्याण लोकसभा निवडणुकीदरम्यान एका निवडणूक सभेत कथित व्हिडिओ दाखवण्यात आल्याच्या प्रकरणावरून दिवंगत वसंत डावखरे यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयीन खटला सुरू झाला.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तक्रारदार पक्षाकडून 20 हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये पोलीस अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यानंतर सर्व आरोपींची कलम 313 अंतर्गत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
ऑगस्ट 2026 मध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात आपले जबाब नोंदवले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले होते.
दरम्यान, कथित सीडी, त्यातील एडिटिंग, फॉरेन्सिक अहवाल आणि तपास प्रक्रियेवर बचाव पक्षाने प्रश्न उपस्थित केले होते. आरोपींचा या कथित प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा ठोस पुरावा नसल्याचा दावा बचाव पक्षाने न्यायालयात केला.
तब्बल 17 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर आज कल्याण न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.



