DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -कल्याण-शीळ फाटा परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या परिसरासाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त (वाहतूक) अर्थात DCP (Traffic) नियुक्त करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
कल्याण-शीळ फाटा हा मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली येथून दररोज लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, वाढती वाहनसंख्या, अपुरे वाहतूक नियोजन आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या मार्गावर वारंवार कोंडी होत आहे. परिणामी, नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, प्रवासासाठी मौल्यवान वेळ खर्च करावा लागत आहे.
या समस्येवर केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून चालणार नाही, तर कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध तोडगा काढणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यासाठी कल्याण-शीळ फाटा परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाची स्वतंत्र जबाबदारी वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्वतंत्र DCP (Traffic) नियुक्त झाल्यास वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचे नियमित सर्वेक्षण, समस्याग्रस्त भागांचे विश्लेषण, वाहतूक कर्मचाऱ्यांचे प्रभावी नियोजन आणि संबंधित शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणे शक्य होईल. यामुळे वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
- October 16, 2026



