DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या घटनेच्या दिवशी रुग्णालयात कार्यरत असलेल्या आरएमओ डॉक्टर निखत यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तसेच संबंधित डॉक्टर पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
घटनेच्या दिवशी प्रसूती विभागात कार्यरत असलेल्या आरएमओ डॉक्टर निखत यांनी रुग्ण महिलेची आणि नवजात बाळाची प्रकृती याबाबत रुग्णालयात उपस्थित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांना आवश्यक ती माहिती आणि अपडेट देणे अपेक्षित होते. मात्र, तसे करण्यात आले नसल्याचे प्रशासनाच्या चौकशीत समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने रुग्णालयांमधील प्रसूती विभागाच्या कामकाजाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रसूती विभागासाठी एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
याशिवाय, शक्तीधाम रुग्णालयासाठी डॉक्टर उपलब्ध करून देणाऱ्या संबंधित कंत्राटदार कंपनीविरोधातही आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेकडून संबंधित कंपनीला देण्यात येणाऱ्या चालू महिन्याच्या देयकातून २५ टक्के रक्कम कपात करण्यात येणार आहे.अशी माहिती केडीएमसी उपयुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुलभा गायकवाड यांनी शक्तीधाम रुग्णालयाला भेट देऊन घटनेची पाहणी केली होती. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती.
नवजात बाळाच्या मृत्यूच्या घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे महापालिका रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांमध्ये डॉक्टरांची जबाबदारी, समन्वय आणि रुग्णांच्या उपचारातील दक्षता यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.



