DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – केडीएमसीच्या विविध विभागांशी संबंधित जनतेच्या प्रश्नांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास घाणेकर यांनी केडीएमसी मुख्यालयातील आयुक्त बिल्डिंगबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
घाणेकर यांच्या म्हणण्यानुसार, २०२३ पासून केडीएमसीच्या विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अनेक पत्रांना अद्याप कोणत्याही प्रश्नांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत माझ्या सर्व पत्रव्यवहारांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा श्रीनिवास घाणेकर यांनी दिला आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने संबंधित पत्रांवर कार्यवाही करून त्याची माहिती द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
गेल्या काही वर्षांपासून जनतेच्या विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हे आंदोलन करावे लागत असल्याचे घाणेकर यांनी सांगितले. संबंधित प्रश्न सुटेपर्यंत आणि पत्रव्यवहाराला उत्तर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
या आंदोलनामुळे केडीएमसी प्रशासन नागरिकांच्या पत्रव्यवहाराला कितपत प्रतिसाद देते आणि घाणेकर यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.



