DESK MARATHI NEWS NETWORK.
मुंबई/प्रतिनिधी – ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी मराठी चित्रपट *‘गोंधळ’*ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला ऑस्करच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाल्याने महाराष्ट्राच्या आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यापूर्वी २०१५ मध्ये ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता ‘गोंधळ’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
‘गोंधळ’सह ‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर-१’, ‘धुरंधर-२’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भाषांतील चित्रपट ऑस्कर प्रवेशिकेच्या शर्यतीत होते. या विविध आणि दर्जेदार चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड झाली.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे दर्शन घडवणारा हा चित्रपट भारतीय मातीत रुजलेला असला तरी त्याची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचा विश्वास चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर यांनी व्यक्त केला आहे.
भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा केवळ चित्रपटाचा सन्मान नसून भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची जिवंत लोकपरंपरा आणि आपल्या मातीतून जन्मलेल्या कथेचा राष्ट्रीय गौरव असल्याचे डावखर यांनी म्हटले आहे. या निवडीबद्दल त्यांनी भारत सरकार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तसेच निवड समितीतील ज्युरी सदस्यांचे आभार मानले.
‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे हे यश असल्याचे सांगत डावखर यांनी कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्यांचेही कौतुक केले. तसेच कुटुंबीय, कंपन्यांतील अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या पाठबळामुळे चित्रपटनिर्मितीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी ‘गोंधळ’चे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध रोडमॅप तयार करण्यात आला असून जागतिक स्तरावर चित्रपटाचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी टीम सज्ज असल्याचे डावखर यांनी सांगितले.
‘गोंधळ’ पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून भारतासह जगभरात प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव घेता यावा, यासाठी प्रेक्षकांनी अनधिकृत किंवा पायरेटेड प्रतींचा वापर न करता चित्रपटगृहातच चित्रपट पाहावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने ‘गोंधळ’च्या पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासाकडे आता चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
- September 18, 2026



