DESK MARATHI NEWS NETWORK
डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर परिसरातील पांडुरंग टॉवर शेजारी असलेला महापालिकेचा बायोगॅस प्रकल्प बंद करून त्या जागेवर लहान मुलांसाठी उद्यान विकसित करावे, अशी मागणी मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या प्रकल्पाच्या ठिकाणी २६ ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील बायोगॅस प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विकास आराखड्यात उद्यानाचे आरक्षण असल्याचा दावा
प्रल्हाद म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात या जागेवर ‘लहान मुलांचे उद्यान’ असे आरक्षण आहे. मात्र, आरक्षणात बदल न करता या ठिकाणी बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रदूषण नियंत्रणाची परवानगी आणि हरित क्षेत्रासंदर्भातील परवानग्यांच्या अभावाच्या मुद्द्यांवर न्यायालयाने प्रकल्पाला स्थगिती दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
परवानग्या आणि पर्यावरणीय नियमांवर प्रश्नचिन्ह
बायोगॅस प्रकल्प उभारताना घनकचरा व्यवस्थापन नियम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी, बफर झोनचे निकष, पर्यावरणविषयक ना-हरकत प्रमाणपत्र तसेच नगररचना आणि आरक्षणातील बदल यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचे पालन झाले आहे का, असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या हिताचा आणि परिसराच्या विकासाचा विचार करून हा प्रकल्प बंद करण्यात यावा. तसेच, विकास आराखड्यानुसार या जागेवर लहान मुलांसाठी उद्यान विकसित करून परिसरातील नागरिकांना मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रल्हाद म्हात्रे यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
आता या मागणीवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे गणेशनगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
- October 28, 2026



