DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिकेने शुक्रवारी धडक कारवाई केली. महापालिकेच्या पथकाने अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करताच काही फेरीवाल्यांनी त्याला विरोध केला.कारवाईसाठी आलेल्या महापालिकेच्या वाहनासमोरच फेरीवाल्यांनी ठिय्या मांडत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी फेरीवाल्यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याशी हुज्जत घातल्याचे समोर आले. त्यामुळे काही काळ स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना तसेच प्रवाशांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. मात्र, कारवाईदरम्यान फेरीवाल्यांनी विरोध केल्याने प्रशासन आणि फेरीवाले यांच्यात वाद निर्माण झाला.
महापालिका प्रशासनाने स्टेशन परिसरातील अतिक्रमण आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.



