नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक गजबजलेले शहर अशी कल्याणची ओळख आहे. कल्याणात कधी काय होईल याचा नेम नाही. अशातच दोन दिवसांपूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृत तरुणाची ओळख पटत नव्हती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी हा मृत्युमुखी पडलेला तरुण कोण? आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला? याचा तपास कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी करत होते. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता रुग्णालयात पाठविला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी आपल्या हाती घेतला. यामध्ये महात्मा फुले पोलिसांनी एसटी स्टॅन्ड परिसरातील विकास कामावर देखरेख ठेवण्याकरीता नेमलेल्या एका खाजगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले. सुरक्षा रक्षकांची कसून चौकशी केली असता अखेर सत्य उघड झाले.
कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. कल्याण स्टेशन समोरील जुने एसटी स्टॅन्ड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केले जात आहे. हे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले. या विकास कामासाठी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपासून या परिसरात भंगार चोरले जात असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळेस त्या चोरट्याच्या मागावर होते. त्यांनी भंगार चोरणाऱ्याला पकडले आणि त्याच्यासोबत बेदम मारहाण केली. या मारहाणीत भंगार चोरणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. अशी माहिती महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार सुरक्षा रक्षकांना अटक केलेली आहे.



