कल्याण/प्रतिनिधी – कोरोना टेस्टच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आशिष बाळकृष्ण सोनवणे असे या तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील काटेनवली परिसरात राहणारा आहे. पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असलेला आशिष विरोधात याआधी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रेल्वे प्रवाशांनी अशा बनावट टीसी पासून सावधान रहा, असा काही प्रकार आढळल्यास तत्काळ कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कल्याण रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांना केलं आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील चार नंबर फलाटावर मंगळवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास एक तरुण आपल्या पत्नीसह लोकलची वाट पाहत बसला होता. इतक्यात त्याच्याजवळ आलेल्या आशिषने त्याच्याकडे तीकिटाची विचारणा केली. सदर तरुणाने तिकीट दाखवताच आशिषने त्यांच्याकडे आरटीपीसीआर सारख्या कोरोना टेस्ट केल्याचे सर्टिफिकेट दाखविण्याची मागणी केली. त्याच्याकडे सर्टिफिकेट नसल्याचे कळताच आशिष ने त्यांच्याकडे ३०० रुपये दंडाची मागणी केली. यामुळे या दाम्पत्याला संशय आल्याने त्याने त्याला पकडून रेल्वे पोलीसांकडे नेले.
रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा बनावट टीसी असल्याचे निष्पन्न झालं. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर सुरत पोलीस ठाण्यासह कल्याण मधील विविध पोलीस ठाण्यात ७ गुन्हे दाखल असून त्याने यापूर्वी किती गुन्हे केले याचा तपास सुरू असल्याचे कल्याण रेल्वे पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दूल वाल्मिक यांनी सांगितले.



