DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि युवकांच्या अपेक्षांना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी डोंबिवलीत दाखल होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे विद्यार्थी सेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
डोंबिवलीतील प्रगती कॉलेजमध्ये सकाळी १० वाजता अमित ठाकरे विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता पेंढरकर कॉलेजला भेट देऊन ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
या संवादादरम्यान शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या संधी, युवकांसमोरील आव्हाने आणि विद्यार्थीहिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेण्याबरोबरच त्यांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर विद्यार्थी सेनेकडून भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला अमित ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे अधिक व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमित ठाकरे यांचा डोंबिवली दौरा हा केवळ सदस्य नोंदणीपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे डोंबिवलीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.



