DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. प्रशांत पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. रेडिओलॉजिस्टची देशपातळीवरील शिखर संघटना असलेल्या इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनच्या (IRIA) राष्ट्रीय निवडणुकीत त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत २०२७-२८ या कालावधीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा मान पटकावला आहे. या निवडणुकीत डॉ. पाटील यांना तब्बल १०,९३७ मते मिळाली. त्यांनी आसामचे प्रतिस्पर्धी डॉ. दिपू बायन यांचा ४,९४३ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्यांच्या या विजयामुळे कल्याणसह महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या IRIA या संघटनेचे देशभरात २७,५६४ सदस्य असून, जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी रेडिओलॉजी संघटना म्हणून तिची ओळख आहे. २०२७ आणि २०२८ या वर्षांसाठी झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत एकूण १५,१२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनल आणि डेमोक्रॅटिक पॅनल यांच्यात प्रमुख लढत झाली. त्यामध्ये प्रोग्रेसिव्ह पॅनलने सर्वच्या सर्व १६ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या पॅनलकडून राष्ट्रीय उपाध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणाऱ्या डॉ. प्रशांत पाटील यांचा विजय विशेष लक्षवेधी ठरला.



