DESK MARATHINEWS NETWORK
डोंबिवली प्रतिनिधी/ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी निद्याधडक कारवाई सुरू केली आहे. डोंबिवली पूर्वेतील पाटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या इमारतीमध्ये असलेल्या केनरा बँकेकडे मालमत्ता करापोटी तब्बल ४८ लाख ९२ हजार ८७७ रुपयांची थकबाकी असल्याने महापालिकेच्या ‘फ’ प्रभागक्षेत्र कार्यालयाने शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी बँकेचे एटीएम सील केले. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. महापालिका आयुक्तांनी कर विभागाला वसुलीचे उद्दिष्ट दिले असून, त्यानुसार थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत ‘फ’ प्रभागक्षेत्रातील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील पाटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या इमारतीमधील केनरा बँकेकडे मालमत्ता कराची एकूण ४८,९२,८७७ रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्याबाबत बँकेला दोन वेळा पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तसेच बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेऊनही कराचा भरणा करण्यासंदर्भात वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही बँकेकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने महापालिकेने कठोर पाऊल उचलले.
मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी संबंधित एटीएम सील करण्याची कारवाई करण्यात आली. ‘फ’ प्रभागक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली कर अधीक्षक सर्फराज तडवी आणि कर वसुली कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
इतर बँकांवरही कारवाईचा इशारा
दरम्यान, ‘फ’ प्रभागक्षेत्रातील मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या इतर बँकांवरही यापुढे अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईनंतर थकबाकीदार बँका मालमत्ता कराचा भरणा करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.



