DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याण पश्चिमेतील उंबरडे डंपिंग ग्राउंड येथे कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी कल्याण काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणी काँग्रेसने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे विनंती केली असून, संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही का, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
उंबरडे डंपिंग ग्राउंडवरील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले होते. त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात आली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला आहे.
आता या प्रकरणी महापालिका प्रशासन आणि पोलीस काय भूमिका घेतात, तसेच संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



