DESK MARATHI NEWS NETWORK,
कल्याण/प्रतिनिधी -भारतीय संस्कृतीतील दीपाचे महत्त्व जपत बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दीप अमावस्येनिमित्त बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेच्या नूतन वास्तूमध्ये उत्साहात दीपोत्सव साजरा केला. विविध आकारांचे आणि बहुरंगी दिवे विद्यार्थ्यांनी घरून आणत शाळेच्या परिसरात आकर्षक दीपसजावट केली.
या दीपोत्सवाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक शामल गायकर आणि बालक मंदिर संस्थेचे पदाधिकारी रमेश गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी हिंदू संस्कृतीमध्ये दीपाला असलेले महत्त्व विशद करण्यात आले. कुटुंबातील दुःख दूर होऊन अज्ञानाचा अंधार नाहीसा व्हावा आणि प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडावा, अशी प्रार्थना करण्यात आली.

या उपक्रमात बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक दीपसजावटीला पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दीपमय झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचे परिचय व स्वागत मीनाक्षी सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पालक-शिक्षक संघाचे सचिव शशिकांत गवारे यांनी केले. कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण जितेंद्रसिंग निकुंभ यांनी केले. मंडप व्यवस्थेची जबाबदारी मंगेश घाटे यांनी सांभाळली. पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अलका जडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी पूर्व प्राथमिक शाळेच्या निमंत्रित सदस्य वृषाली जोशी, प्राथमिक शाळेचे निमंत्रित सदस्य राजेंद्र फडके उपस्थित होते.
संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई पवार, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजाताई पेठे, ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा मोरे, विद्या घुले तसेच पूर्व प्राथमिक शाळेच्या गौरी रानडे यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांविषयीची जाणीव रुजविण्यासोबतच सामूहिक सहभागातून आनंदाचा अनुभव देणारा हा दीपोत्सव उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.



