DESK MARATHI NEWS NETWORK,
कल्याण/प्रतिनिधी – आंबिवली येथील इराणी वस्तीत खडकपाडा पोलिसांनी बुधवारी पहाटे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोक्का, जबरी चोरी तसेच अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या तीन आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत एका आरोपीकडून तब्बल ८ लाख रुपये किमतीचा ४० ग्रॅम मेफेड्रॉन एम.डी.हा प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३ कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली पाच पोलीस पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी १२ ऑगस्ट रोजी पहाटेपासून आंबिवलीतील इराणी वस्तीत कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. अमली पदार्थविरोधी तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी तीन आरोपींना शिताफीने घेराव घालत ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शमा तेहजीब इराणी ,मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख आणि नफिसा हाश्मी इराणी यांचा समावेश आहे.
यापैकी मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख याच्याकडे ४० ग्रॅम मेफेड्रॉन एम.डी.,सुमारे ८ लाख रुपये किमतीचा, आढळून आला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शमा इराणी ही विविध गुन्ह्यांत पाहिजे आरोपी असून तिच्याविरोधात खडकपाडा तसेच कुळगाव आणि वाकड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर नफिसा हाश्मी इराणी ही मानपाडा पोलीस ठाण्यातील मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.



